दापोली प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिवाजीनगर भौंजाळी या शाळेस रत्नागिरी जिल्हा परिषदेचा सन 2025 चा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे. शिवाजीनगर भौंजाळी शाळेचे संपूर्ण दापोली तालुक्यातून अभिनंदन होत आहे. दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिवाजीनगर भौंजाळी ही उपक्रमशील शाळा असून ही शाळा विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असते.
शिवाजीनगर भौंजाळी शाळेच्या कार्यक्षेत्रातील सर्व पालक व ग्रामस्थांच्या सहकार्यातून शिवाजीनगर भौंजाळी शाळेने शालेय इमारत दुरुस्ती, रंगरंगोटी, शालेय बाग, मिशन आपुलकी, डिजिटल वर्ग, बीडीएस, शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश चांगली शैक्षणिक गुणवत्ता आदी बाबतीत फार मोठ्या प्रमाणात व भरीव काम केले आहे.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवप्रताप राणे, माजी सरपंच सचिन सावंत, सरपंच सुवर्णा अबगुल, उपसरपंच राजेश पवार, गणेश रेवाळे, अक्षया मोहिते, शालेय शिक्षक पालक संघ, माता पालक समिती अशा सर्वांच्या सहकार्यातून शिवाजीनगर भौंजाळी शाळेने उल्लेखनीय कार्य केले आहे.
प्रशाळेचे मुख्याध्यापक विश्वास भोपे व उपशिक्षिका सरिता हजारे ,शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच स्वयंपाकी दर्शना कुंबेटे यांच्या प्रयत्नांतून या शाळेने विविध उपक्रम व स्पर्धांमध्ये दैदीप्यमान कामगिरी केली आहे. याची रत्नागिरी जिल्हा परिषदेने दखल घेतली असून चालू वर्षासाठीचा आदर्श शाळा पुरस्कार या शाळेस जाहीर केला आहे.
शिवाजीनगर भौंजाळी शाळेस आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दापोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनिल कारखेले यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
