तिसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीमध्ये केले प्रतिपादन
” चवदार तळे संगर शतकपूर्ती व दीर्घकालीन पडसाद ” या विषयावरील परिसंवाद.
गोपाळ बाबा वलंगकर साहित्य नगरी- महाड
चिपळूण (प्रतिनिधी) : महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हा केवळ सवर्ण पुढारी सहभागी झाल्यामुळे झालेला नसून, त्याची पार्श्वभूमी चार-पाच वर्षे अगोदर पासून तत्कालीन अस्पृश्य समाजातील मंडळींनी तयार केली होती. त्याचे नेतृत्व रामचंद्र तथा आर बी मोरे यांच्यासारख्या मंडळींनी केले होते. त्यामुळे रायगड मधील अन्यायाच्या विरोधात उभी ठाकलेली तत्कालीन सर्व अस्पृश्य मंडळी आणि त्यांना मिळालेली काही सवर्ण लोकांची साथ यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चवदार तळ्याचा सत्याग्रह होऊ शकला, त्याचे दीर्घकालीन पडसाद पाहायला मिळतात. त्याचा वास्तवदर्शी अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मत चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते कॉम्रेड सुबोध मोरे यांनी येथे केले.
अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने तिसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीचे आयोजन महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात करण्यात आले होते. त्यावेळी ते ” चवदार तळे संगर : शतकपूर्ती व दीर्घकालीन पडसाद ” या विषयावरील परिसंवादात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र मुंबरकर होते. या परिसंवादात अभ्यासात धम्मकिरण चेन्ने , स्नेहा कदम सहभागी झाल्या होत्या.
कॉम्रेड सुबोध मोरे पुढे म्हणाले, 1923 मध्ये सार्वजनिक पानवठे खुले करण्याबाबत बोले ठराव करण्यात आला. मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती महाड आणि परिसरातील सार्वजनिक पाणवठे खुले करण्यासाठी तत्कालीन अस्पृश्य मंडळींकडून प्रयत्न केले जात होते. मात्र त्यांच्यावरील अन्याय अत्याचार वाढत चालले होते. अशा पार्श्वभूमीवर लोक सुसंघटीत होऊन ‘ कोकणस्थ महार सेवा संघ ‘ अशा सारख्या संस्थेच्या नावाखाली एकत्र येऊन लढ्यासाठी सज्ज झाले होते. अशातच महाड मधील तत्कालीन नगराध्यक्ष सुरबानाना टिपणीस, ग वि सहस्त्रबुद्धे, चित्रे यांसारख्या अस्पृश्य मंडळींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेटीगाठी करून महाडमध्ये अस्पृश्य मंडळींकडून सभा घेण्याबाबत चाललेल्या कार्यवाहीची माहिती देऊन आपण त्या सभेकरिता अध्यक्ष म्हणून उपस्थित रहावे, असे सुचवण्यात आले. त्यानुसार 19 व 20 मार्च 1927 रोजीची परिषद ठरवण्यात आली होती आणि ती पुढे इतिहासात अजरामर झाली. या परिषदेचे दीर्घकालीन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पडसाद समाजमनावर उमटत राहिले आणि आजही ते उमटत आहेत.
ऍड.धम्मकिरण चन्ने यांनी महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा इतिहास आणि त्या मागच्या विविध बाजू उलगडून सांगितल्या. त्याचे वेगवेगळे कंगोरे सांगितले. तसेच युवा साहित्यिक स्नेहा कदम हिने चवदार तळ्याच्या पाण्याचे महत्व आणि त्यासाठी उभा राहिलेला लढा, त्याचे परिणाम याचा मागोवा काव्यरूपी भाषेमध्ये घेतला.
अध्यक्षीय भाषणात डॉक्टर राजेंद्र मुंबरकर म्हणाले, चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला दोन वर्षांनी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या शताब्दी वर्षात चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या अनुषंगाने चळवळीच्या दृष्टीने वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास होण्याची नितांत आवश्यकता आहे. सद्यस्थितीत आंबेडकरी चळवळीतील गटातटामुळे चळवळीचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे आगामी काळात चळवळीतील प्रत्येक घटकांनी संघटित होण्याची नितांत आवश्यकता आहे. तरच समाजासाठी विधायक काम उभे करता येऊ शकेल. 100 वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी जे काम उभे केले, त्या कामाला उभारी आणण्यासाठी सर्व घटकांनी पुढे येण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गोविंद जाधव यांनी आभार जयराम तांबे यांनी मानले.
त्यापूर्वी “कथा वाचन – अभिवाचन ” कार्यक्रम बा.स.हाटे मंचावर घेण्यात आली. त्यामध्ये कवयित्री लेखिका सरिता पवार, ‘कामाठीपुरा’कार सुधीर जाधव, कथालेखक भावेश लोखंडे यांनी आपल्या कथांचे वाचन अभिवाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम तर आभार जनार्दन काकडे यांनी मानले.

