
*रत्नागिरीत क्षेत्रिय वैदिक संमेलनाचे शानदार उद्घाटन*
रत्नागिरी
आधुनिक काळातील ताणतणावाच्या जीवनात स्वास्थ्य मिळवण्यासाठी संस्कृत वाचन, पठणातून काही उपाययोजना करता येते का, याचे संशोधन व्हायला हवे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले. क्षेत्रिय वैदिक संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्कृत ही भारताची पुरातन भाषा आहे. तिचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत; पण या भाषेचा उपयोग पोथ्या आणि पुराणांमध्ये राहिला आहे. त्यापलीकडे जाऊन आधुनिक काळातील प्रश्न सोडविण्यासाठी या भाषेचा आणि त्यातील वाङ्मयाचा उपयोग होतो का, याचाही अभ्यास केला पाहिजे, असे श्री. कुलकर्णी म्हणाले.
शिकवण आहे वेदांची नदी माता सगळ्यांची, वेद शिका, वेद पुढे जा, वेद वाचा, देश राखा अशा घोषणा देत आणि फलक प्रदर्शित करत आज रत्नागिरी शहरात वेदांचा जागर करण्यात आला. निमित्त होते क्षेत्रीय वैदिक संमेलनाचे. कपाळी टिळा, पांढरे धोतर, उपवस्त्र, भगवी टोपी अशा पारंपरिक वेशभूषेतील पौरोहित, वेदाध्ययन करणारे तरुण, ज्येष्ठ या शोभायात्रेत सहभागी झाले. भगवा ध्वज, पताकाही फडकत होती.*
शोभायात्रेचे उद्घाटन श्रीफळ वाढवून विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ वेद अभ्यासक डॉ. गणेश थिटे, प्रा. अंबरिष खरे, डॉ. दिनकर मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
