कोकण विभागात ३९ पैकी ३५ जागा महायुतीला यश
रत्नागिरी
विनोद भाजपाची ज्येष्ठ नेते विद्यमान खासदार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या बरोबरीने आता भाजपामधील मंत्री रवींद्र चव्हाण यांचे हे नाव घेतले जात आहे त्यांनीही लोकसभा, विधानसभा काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका या निवडणुकांमध्ये महायुतीला यश मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर अनेक भाजपतील पदाधिकारी कार्यकर्ते सकारात्मक आहेत. विधानसभा निवडणुकीतही कोकणातील काही मतदारसंघात महायुतीमधील वाद मिटवण्यात रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेत बैठका घेतल्या होत्या मात्र तरीही काही मोजक्याच भाजप पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेत काम केल्याचे सर्वज्ञात आहे. आता त्यांच्यावर कोणती कारवाई होणार हेही या निमित्ताने पहावं लागणार आहे.
भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीने कोकण पट्ट्यात ३९ पैकी ३५ जागा जिंकून कोकणातला विजयाचा स्ट्राईक रेट ९० टक्के नोंदवला आहे. त्याचे श्रेय प्रामुख्याने भाजपा नेते आमदार रविंद्र चव्हाण यांना देत भाजपाने कोकणातही आता स्वबळाची तयारी सुरू केली आहे. मुंबई महानगर प्रदेश व कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा रवींद्र चव्हाण यांनी राजकारणातील बुद्धिबळाचे डाव टाकले होते. मात्र याच वेळी भाजपाचे कोकणातील ज्येष्ठ नेते विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या बरोबरीने आता रवींद्र चव्हाण यांचे नेतृत्व कोकणासाठी प्रोजेक्ट करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे मुंबई जिल्ह्यात नारायण राणे यांना मानणारा मोठा वर्ग राणे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत पुढे आलेले राज्यातील मोठे नेतृत्व आहे. अशातच आता कोकणातील नेते म्हणून रविंद्र चव्हाण यांचे नाव घेतले जात असले तरी राणे यांची भूमिका ही सगळ्यात महत्वाची असून यावरच काही राजकीय गणिते अवलंबून आहेत.
सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या डोंबिवलीसारख्या मोठ्या शहरात रास्व संघ – भाजपाच्या विचारधारेशी अतूट नाते असलेले रविंद्र चव्हाण प्रतिनिधित्व करतात. तसेच वेळप्रसंगी रस्त्यावरच्या लढाईतही ते डगमगत नाहीत, असा त्यांचा लौकिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाते आणि संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज ही चव्हाण यांची खासियत आहे.
त्यामुळे एकाच वेळेस संघाची वैचारिक बैठक आणि संघटनेची ताकद असे दुहेरी कौशल्य असलेला नेता त्यांच्या रूपाने भाजपा महायुतीला मिळाला आहे. लोकसभा निवडणूक असो, विधानसभा निवडणूक असो किंवा मग विधान परिषदेची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, गेल्या काही महिन्यांमध्ये भाजप-महायुतीला सातत्याने यश मिळत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा निवडणूक प्रचार यंत्रणा प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्यावरच टाकली होती.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात रविंद्र चव्हाण यांनी कधी पालघर, तर कधी रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे करत अख्खे कोकण पालथे घातले. सभा घेत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला, बैठका घेत प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत कोकणातील ३९ जागांपैकी ३५ जागांवर भाजप-महायुतीचा विजय झाला. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बविआ पक्षाला मात देत ६ पैकी ५ जागांवर महायुतीने विजयाचा ध्वज फडकावला.
या विजयानंतर रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर आणि कोकण तसेच पालघर भागातील भाजपच्या कामगिरीवर लोकांचा विश्वास असल्याचे अधोरेखित झाले आहे.
रवींद्र चव्हाण यांनी मागील सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम सारखे महत्त्वाचे खाते सांभाळले होते. त्यातून त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक ९६ हजार कोटी रुपयांचा निधी राज्याच्या पायाभूत सुविधा विकासासाठी उपलब्ध करून दिला. भाजपा महाराष्ट्राच्या कोअर कमिटीचे सदस्य, महामंत्री आणि महत्त्वाचे कॅबिनेट मंत्रिपद अशा तीन पातळ्यांवर काम करताना राज्याच्या सर्वच भागांतील राजकीय, सामाजिक आणि पक्षीय परिस्थितीचे आकलन रवींद्र चव्हाण यांना होते. त्यांच्या राजकीय रणनीतीवर शीर्षस्थ नेतृत्वचाही भरवसा असल्याने त्यांना उमेदवार निवडीचाही अधिकार देण्यात आला होता. यावेळी चव्हाण यांनी शीर्षस्थ नेतृत्वाशी चर्चा करून उमेदवार निश्चित केले होते.
त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि रवींद्र चव्हाण समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. तरीही कोकणात आता नारायण राणे यांच्याबरोबर रवींद्र चव्हाण यांचे हे नेतृत्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून प्रोजेक्ट होत असल्याने हा इशारा नेमकं कोणासाठी याच्याही उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका यामध्ये या नारायण राणे यांच्याबरोबर रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाचा पुन्हा एकदा कस लागणार आहे.
