दापोली प्रतिनिधी
“सुशासन सप्ताह” दिनांक १९ ते २४ डिसेंबर २०२४ दरम्यान साजरा करणेत येत असून, त्यानिमित्त दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी दापोली तालुक्यातील सुशासन प्रशासनाच्या यशस्वीकथा कर्मचा-यांना सांगून व त्यांना मार्गदर्शन करुन प्रेरणा देणेकामी मा.एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली दापोली प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचे अध्यक्षतेखाली व दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांचे उपस्थितीत तहसिल कार्यालय, दापोली येथे कार्यक्रम पार पडला.
अर्चना बोंबे, तहसिलदार दापोली यांनी सुशासन सप्ताह निमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विरसई ग्रामपंचायतीचे सरपंच मनोरमा राणे व ग्रामसेवक विरेश कदम हे ह्या ठिकाणी उपस्थित होते. विरसई ग्रामपंचायतीस माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये कोकण विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून पन्नास लाखाचे पारीतोषिक मिळविले. याकरीता ग्रामस्थांचे सहकार्य व लोकसहभागातून गावाचा विकास कसा केला व यापुढे राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्ट आहे असे ग्रामसेवक विरेश कदम यांनी सांगितले. तसेच सर्वांना याबाबत मार्गदर्शन केले.
कर्दे गावचे सरपंच सचिन तोडणकर हे देखील यावेळेस उपस्थित होते. कर्दे गावास केंद्रीय पर्यटन मंत्रालय यांचेकडून सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव कृषी पर्यटन यामध्ये महाराष्ट्रामधून कर्दे या एकाच गावास पुरस्कार मिळाला. पर्यटन ही दापोलीची ओळख आहे व दापोलीस राष्ट्रीय पातळीवर नेण्यास गावातील ग्रामस्थ यांनी केलेले नियोजन याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच भविष्यात कोणत्या कोणत्या योजना राबवणार याची माहिती दिली. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी राबविलेल्या उपक्रमामुळे “मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा” स्पर्धेत कर्दे गावाच्या शाळेस जिल्हा स्तरीय प्रथम क्रमांकाचे दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळाले, याबाबतही यशाची गाथा सांगितली.
डॉ. अजित थोरबोले, उपविभागीय अधिकारी दापोली यांनी सदर उपक्रमातून, प्रेरणा घेऊन जनतेप्रती सुप्रशासन कसे चालवावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच तहसिल कार्यालय दापोलीमधील विविध दाखले, रेशनकार्ड व संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले.

