सिंधुदुर्ग,मालवण
राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत स्थानिक खेळाडूंना मोफत प्रवेश देण्याची मागणी मालवणातील खेळाडूंच्यावतीने सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत यांनी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे व तहसीलदार वर्षा झालटे यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मालवण चिवला बीच येथे मुंबईच्या एका संस्थेच्या माध्यमातून पोहण्याची स्पर्धा (स्विमिंग कॉम्पिटिशन) आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाला दोन हजार रुपये प्रवेश फी आकारली जाते. याद्वारे लाखो रुपयांचा नफा कमावला जातो. मात्र, स्थानिक मुलांना फीमध्ये कोणत्याही प्रकारे सूट दिली जात नाही. स्थानिक मुलांचे पालक शहरवासीयांप्रमाणे तुलनेत आर्थिकदृष्ट्या संपन्न नसल्यामुळे केवळ आर्थिक कारणास्तव स्थानिक मुलांना या स्पर्धेत सहभागी होणे शक्य होत नाही. या स्पर्धेसाठी नगरपरिषदेमार्फत स्थानिक भूमिपुत्रांना फीमध्ये १०० टक्के सूट देण्याची अट सदर संस्थेला परवानगी देतानाच घालावी. तसेच येथील भूमिपुत्रांसाठी हे कायमस्वरुपी धोरण ठेवावे. या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख प्रवेश अर्जामध्येच केलेला असावा, असे निवेदन मालवण नगरपालिका व तहसीलदार कार्यालयात देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक यतीन खोत, मंदार केणी, शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक महेश जावकर, सन्मेश परब, तपस्वी मयेकर, नरेश हुले, अमन बेग, निखिल शिंदे, नंदा सारंग, शांती तोंडवळकर, अश्विनी आचरेकर, मानसी घाडीगावकर, तन्वी भगत आदी उपस्थित होते

